महाराष्ट्र


डी वाय साखर इथेनॉल प्रकल्पाची निर्मिती करणार -आम. बंटी पाटील
  • Published at : 19-09-2018 15:27:47

तिसंगी प्रतिनिधी: ‘‘साखर दरातील घसरण व शासनाच्‍या चुकीच्‍या धोरणामुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत येऊन एफ.आर.पी.प्रमाणे ऊस बिले आदा करणे अडचणीचे झाले आहे. साखर दरावर अवलंबून न राहता उपपदार्थावर आधारीत प्रकल्‍प उभारून कारखान्‍याचे आर्थिक स्‍त्रोत वाढविणे गरजेचे आहे. यासाठी येत्‍या दोन वर्षात कारखान्‍याकडे 45 के.एल.पी.डी. क्षमतेचा डिस्‍टीलरी व इथेनॉल प्रकल्‍पाची उभारणी करणार आहे’’ असे प्रतिपादन कारखान्‍याचे अध्‍यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या 24 व्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ते पुढे म्‍हणाले, शेतकरी सध्‍या आर्थिक अडचणीत असताना शासनाचे शेतक-यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्‍यामुळे आर्थिक सुबत्‍ता येण्‍यासाठी शेतक-यांनी कृषी क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. कारखान्‍याने यापूर्वी सहवीज निर्मिती प्रकल्‍प राबविला असल्‍याने ऊस दर देण्‍यास सहाय्य झाले. उपस्थितांचे स्‍वागत व विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक जयदिप पाटील यांनी केले. डिस्‍टीलरी व इथेनॉल प्रकल्‍प उभारणीसाठी सभासदांनी बहुमताने मंजूरी दिली तसेच सभेपुढील सर्व विषय सभासदांनी मंजूर केले. सभेस कारखान्‍याचे संचालक बजरंग पाटील, मानसिंग पाटील, बंडोपंत कोटकर, गुलाबराव चव्‍हाण, उदय देसाई, चंद्रकांत खानविलकर, दत्‍तात्रय पाटणकर, खंडेराव घाटगे, प्रभाकर तावडे, जयसिंग ठाणेकर, शामराव हंकारे, वैजयंती पाटील, वनमाला पाटील, यांचेसह सभासद, खातेप्रमुख उपस्थित होते. सुत्रसंचलन एकनाथ लोखंडे यांनी केले तर सेक्रेटरी नंदू पाटील यांनी आभार मानले. चौकट - तालुक्‍यात चालू वर्षी झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे ऊस व भात पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्‍याने शासनाने ऊस पिकास एकरी 50 हजार मदत द्यावी, घरगुती व कृषी पंपाची अन्‍यायी वीज दरवाढ मागे घ्‍यावी, जिल्‍हा बँकेने चालू कर्ज वसुलीबाबत पिक कर्ज मध्‍यम मुदत न करता हप्‍ते पाडून बिनव्‍याजी वसुल करावे हे तीन महत्‍वपूर्ण ठराव चेअरमन आमदार सतेज पाटील यांनी मांडले. ते या सर्वसाधारण सभेत सभासदांच्‍यावतीने बहुमताने मंजूर करण्‍यात आले.