महाराष्ट्र


आता कार्डाशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार
  • Published at : 07-09-2018 15:47:06

नवी दिल्ली: एटीएम कार्ड हरवलं किंवा घाई गडबडीत घरीच राहून गेलं तर एटीएममधून पैसे काढण्याची पंचाईत होते. त्यामुळे मित्रांकडे पैसे उसणे मागण्याची नामुष्की ओढवते. मात्र आता तुमच्यावर ही परिस्थिती ओढवणार नाही. कारण आता तुम्हाला एटीएम कार्डाशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. एअरटेलने ही खास सुविधा दिली असून देशातील काही मोजक्याच एटीएमवर सध्या तरी ही सुविधा राहणार आहे. इन्स्टंट मनी ट्रान्स्फर प्राद्योगिक (आयएमटी) हे जगातील सर्वात मोठं कार्डलेस एटीएम आहे. या आयएमटीचा वापर करून एअरटेलच्या ग्राहकांना पैसे काढता येणार आहेत. एअरटेल पेमेंट्स बँकेच्या खातेधारकांना सध्या आयएमटी प्रणाली असलेल्या २० हजार एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. वर्षअखेरीस या एटीएमची संख्या १ लाखापर्यंत नेण्यात येणार असल्याचं एअरटेलने स्पष्ट केलं. त्यामुळे ग्राहकांना या नव्या सुविधेचा लाभ होणार आहे.