महाराष्ट्र


शिक्षक मतदारसंघासाठी चंद्रकांतदादा भुजबळ यांच्यातच खरी लढाई
  • Published at : 25-06-2018 16:48:47

नाशिक : विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून झालेल्या पराभवाचा धसका राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने चांगलाच घेतला आहे. "ओरीजनल शिक्षक' हवा असा मतप्रवाह शिक्षक मतदारांत रुजत आहे. त्यामुळे भाजपसाठी विधान परिषदेत संख्याबळाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीसाठी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच लक्ष घातले आहे. टीडीएफ पुरस्कृत संदीप बेडसेंसाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी बाह्या सरसावल्याने शिक्षकांसाठी अप्रत्यक्षपणे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत शिक्षक संघटनेचे भाऊसाहेब कचरे, भाजपचे अनिकेत पाटील, टीडीएफ पुरस्कृत संदीप बेडसे, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, भाजपशी संबंधीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सुनील पंडीत, भाजप बंडखोर प्रतापदादा सोनवणे आदी सोळा उमेदवार रिंगणात आहेत. उत्तर महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघात सोळा उमेदवार आहेत. यामध्ये भुजबळांचे निकटवर्तीय संदीप बेडसे टिडीएफ पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यांना कॉंग्रेस आघाडीसह धर्मनिरपेक्ष पक्ष व या गटातील माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनीही पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आदी चार माजी मंत्र्यांनी त्यांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे चार विद्यमान मंत्री विरुध्द कॉंग्रेस आघाडीचे चार माजी मंत्री प्रचारात उतरले. त्यामुळे निवडणूक शिक्षकांची व पणाला लागलीय प्रतिष्ठा राजकारण्यांची अशी स्थिती आहे. भाजपने कॉंग्रेसचे माजी मंत्री विजय नवल पाटील यांचे चिरंजीव अनिकेत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. श्री. पाटील यांच्या प्रचाराची सर्व सुत्रे पडद्यामागून विजय नवल पाटील हाताळत आहेत. गेली अनेक वर्षे सत्ता व पद दोन्हींपासून दुर असल्याने त्यांच्या कुटुंबाला राजकीय ब्रेक मिळण्यासाठी ही त्यांना मोठी संधी वाटते. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करायला अन्‌ प्रचारातही त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना मैदानात उतरवले. शेवटच्या टप्प्यात तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बैठक घेतली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव, नाशिक या दोन्ही जिल्ह्यात बैठक घेत थेट संस्थाचालक, शिक्षक संघटनांशी संपर्क करुन मदतीचे आवाहन केले. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री राम शिंदे यांच्यावरही विविध जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. स्वतः चंद्रकांतदादा रोज उमेदवाराच्या संपर्कात असल्याने उमेदवारापेक्षा त्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.