महाराष्ट्र


लिंबूची आवक कायम मागणी घटली
  • Published at : 25-06-2018 16:45:27

कोल्हापूर : लिंबूची आवक कायम असली तरी पावसामुळे मागणी कमालीची घटली आहे. त्याचा थेट परिणाम दरावर झाला असून रविवारी लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात लिंबूचे ढीगच दिसत होते. दहा रुपयाला बुट्टीभर लिंबू विक्रीस होते. भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर वधारले असून गवार, भेंडी व दोडका या प्रमुख भाज्यांचे दर प्रतिकिलो ऐंशी रुपयांच्या वर पोहोचले आहेत. गत आठवड्यात साखरेचे दर काहीसे सुधारले होते, पण पुन्हा घसरण सुरू झाले असून किरकोळ बाजारात प्रतिकिलो ३४ रुपये दर आहे. पावसाळा सुरू झाल्याने लिंबूची मागणी एकदम कमी झाली आहे. रविवारी लक्ष्मीपुरी आठवडी बाजारात दहा रुपयाला प्लास्टिकची बुट्टी भरून लिंबू मिळत होते. उन्हाळा संपला की लिंबूच्या मागणीत घट होऊन दरात घसरण सुरू होते. पण यंदा लिंबूची आवक अजूनही चांगली आहे, त्यात मागणी एकदमच कमी झाल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. घाऊक बाजारात तीनशे रुपयांना चुमडे आहे. किरकोळ बाजारात तर दर एकदम खाली आले आहेत. लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात पिवळे धमक रसरसीत लिंबू रुपयाला होते. लहान-मोठे बुट्टीभर लिंबू दहा रुपयांना मिळत होते. पावसाने सुरुवात केल्याने बाजारात स्थानिक भाजीपाल्याची आवक कमी झाली असून दर चांगलेच तेजीत राहिले आहेत.