महाराष्ट्र


उपहारापूर्वी शतक झळकावणारा शिखर धवन पहिलाच भारतीय
  • Published at : 14-06-2018 15:05:58

बंगळुरु: अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत भारताचा सलामीवीर शिखर धवनने खणखणीत शतक झळकावलं. पहिल्या दिवशीच उपहारापूर्वी शतक झळकावणारा धवन हा जगातील सहावा, तर पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. धवनने अवघ्या ८७ चेंडूत शतक झळकावलं. या कसोटीत कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय सलामीवीर धवन आणि मुरली विजयने सार्थ ठरवला. धवनने आधी ४७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. मग त्याने धावगती वाढवत अवघ्या ८७ चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याच्या शतकाला १८ चौकार आणि तीन खणखणीत षटकारांचा साज होता. उपहारापूर्वी शतक झळकावणारा धवन पहिलाच भारतीय फलंदाज तर जगातील सहावा फलंदाज ठरला. उपहारापूर्वी शतक झळकावणारे फलंदाज- व्हिक्टर ट्रम्पर (ऑस्ट्रेलिया), चार्ल्स मॅकार्टनी (ऑस्ट्रेलिया), डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया), माजिद खान (पाकिस्तान), डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), शिखर धवन (भारत). दरम्यान, शिखर धवन ९६ चेंडूत १०७ धावा करुन माघारी परतला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज कसोटी क्रिकेटचा नवा अध्याय लिहिला जात आहे. असगर स्टॅनिकझाईचा अफगाणिस्तान संघ अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाशी खेळून कसोटी क्रिकेटमधलं आपलं पदार्पण साजरं केलं.