महाराष्ट्र


ब्रिटिश फॉर्म्युला थ्री स्पर्धेत कृष्णराज महाडिकचा पुन्हा झेंडा
  • Published at : 29-05-2018 12:12:32

कोल्हापूर / प्रतिनिधी- रेसिंग मध्ये कोल्हापूरचा सुपुत्र कृष्णराज धनंजय महाडिक याने इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या बी.आर.डी.सी. (ब्रिटिश फॉर्म्युला थ्री) स्पर्धेत कृष्णराजने गेल्याच वर्षी प्रथम क्रमांक पटकावून ब्रँडस् हॅच ग्रँड प्रिक्स रेसिंग ट्रॅकवर इतिहास घडविला. कामगिरीत सातत्य राखत रविवारी स्नेटरटन ग्रँड प्रिक्स ट्रॅकवर झालेल्या तिसर्‍या फेरीतील आठव्या रेसमध्ये उपविजेतेपद पटकावले. ‘बीआरडीसी’ ब्रिटिश फॉर्म्युला थ्रीचा हंगाम सुरू झाला असून, इंग्लंडमध्ये मुख्य ८ फेर्‍या आणि प्रत्येक फेरीत ३ रेस अशा २४ रेस होणार आहेत. गेल्या वर्षीच्या कामगिरीच्या जोरावर ‘आर.आर.’ रेसिंग टीमने कृष्णराजला पूर्ण हंगामासाठी मुख्य रेसर म्हणून करारबद्ध केले आहे. कृष्णराजने तिसर्‍या फेरीतील आठव्या रेसमध्ये विजेतेपदाला गवसणी घातलेल्या मॅन्युअल मालदोनादो याला जोरदार टक्‍कर देत पोडियमवर स्थान मिळवले. शेवटच्या लॅपमध्ये तर कृष्णराज आणि मॅन्युअल यांच्या कारमध्ये केवळ अर्ध्या सेकंदाचा फरक होता. त्यांच्यातील या चुरशीमुळे चाहत्यांनाही श्‍वास रोखून धरावा लागला होता. रेस संपताच उपस्थितांनी दोघांच्या कौशल्याला मनमुराद दाद दिली. बक्षीस वितरणानंतर विजेत्या मॅन्युअलनं कृष्णराजचे आवर्जून कौतुक करून स्पोर्टसमनशिप दाखविली. डबल आर टीमचे प्रमुख अँथनी बोयो हियात यांनी कृष्णराजच्या ड्रायव्हिंग स्कीलबाबत प्रशंसा करून त्याच्या रूपाने अत्यंत चांगला चालक बीआरडीसीला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. विजयामुळे आपला आत्मविश्‍वास दुणावला असून, उर्वरित हंगामात आणखी उज्वल कामगिरी करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, अशी प्रतिक्रिया कृष्णराजने व्यक्‍त केली. आजवर या हंगामात १३० गुण मिळवून तो सर्वसाधारण चॅम्पियनशिपमध्ये पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, या हंगामासाठी तयारी करण्याच्या हेतूने कृष्णराज चार महिने इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे.