महाराष्ट्र


सलग १५ व्या दिवशीही पेट्रोल वाढ , आजचा दर - ८६.0८ रुपये
  • Published at : 28-05-2018 12:14:11

मुंबई - कर्नाटक निवडणुकीनंतर सलग पंधराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलच्या प्रतिलिटर दरात १२ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल आज प्रतिलिटर ८६ रुपये ०८ पैसे दरानं तर डिझेलचे प्रतिलिटर ७३ रुपये ६४ पैशांना दरानं मिळत आहे. सलग पंधराव्या दिवशी झालेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशासहीत डोकंदेखील गरम झालं आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवरही झाल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसत आहेत. जीएसटी नेटवर्क पॅनलचे अध्यक्ष व बिहारचे वित्तमंत्री सुशील मोदी म्हणाले, जगभरात जिथे-जिथे जीएसटीसारखा कर आहे, तिथे राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासनाला स्वत:चा उपकर किंवा शुल्क आकारण्याचा अधिकार आहे. भारतातही जीएसटीतील सर्वाधिक कर मर्यादेवर स्वत:चे शुल्क लावण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलला सर्वाधिक २८ टक्के जीएसटीच्या कक्षेत आणले तरी राज्य सरकार स्वत:चे महसुली नुकसान होऊ नये यासाठी उपकर किंवा शुल्क लावतीलच. त्यामुळेच या निर्णयाचा इंधनाच्या दरांवर अत्यंत माफक परिणाम होईल. दर क्वचितच कमी होऊ शकतील. शिवाय ‘एक देश एक कर’ या योजनेलाही हरताळ फासला जाईल.