कोपार्डेत घरफोडी, साडेसात लाखाचा ऐवज लंपास

कोपार्डे : (ता करवीर) येथे स्क्रॅप गोळा करणारे कल्पना विलास जगताप यांचे घर फोडून नऊ तोळे दागिने व अडीच लाख रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केलीय.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गेली २५ वर्षे सांगरूळ फाटा, कोपार्डे येथे जगताप कुटुंब राहते. स्क्रॅप गोळा करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. शुक्रवारी अजय जगताप यांचे कोल्हापूर मध्ये लग्न होते. त्यामुळे सर्व कुटुंब कोल्हापूरला राहण्यास गेले होते. लग्नाचा कार्यक्रम आटपून आज सायंकाळी सहा वाजता जगताप कुटुंब गावाकडे आले असता कल्पना जगताप यांना समोरील दरवाजा फोडल्याचे लक्षात आले. चोरट्याने टिकावच्या सहायाने लाकडी दरवाजा फोडुन आत प्रवेश केला. सुरुवातीला एक तिजोरी फोडून यामधील सोन्याचे सुमारे नऊ तोळ्याचे दागिने व अडीच लाख रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केलीय. यानंतर कपड्याची तिजोरी फोडली. तसेच तिसरी तिजोरी चोट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान, तिजोरी फोडता न आल्यामुळे तिजोरीत चाकू अडकून राहिला.दोन मोठे चाकू सोडून चोरट्यानी पलायन केलंय.

कल्पना जगताप यांनी गेल्या काही दिवसापूर्वी स्क्रॅपची गाडी विकून तिजोरीत ठेवलेल्या रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. बालिंगा येथील दरोडा प्रकरण ताजे असताना कोपार्डे येथे घरफोडी झालीय. यामुळे परिसरात नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरलंय. चोरट्यांनी पोलिसांना आव्हान निर्माण केलं आहे.