आमदार हसन मुश्रीफ यांना दिलासा ; अटकपूर्व जामीनावरील सुनावणी तूर्तास तहकूब

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा कायम आहे.

हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी तूर्तास तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे ईडीकडून दाखल केलेल्या प्रकरणांत 20 जूनपर्यंत मुश्रीफ यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. ईडीचा ईसीआयआर रद्द करण्यासाठीही मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

हसन मुश्रीफ यांच्या मुलांनाही तूर्तास दिलासा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हसन मुश्रीफ यांची मुले नाविद, आबिद आणि साजिद यांनाही ईडीच्या अटकेपासून दिलेले संरक्षण विशेष न्यायालयाने तूर्तास कायम ठेवत दिलासा दिला आहे. 14 जूनपर्यंत ईडीने कारवाई करु नये, असे निर्देश सत्र न्यायालयाने दिले आहेत. मुलांनी दाखल केलेल्या अर्जावर 2 जून रोजी सत्र न्यायालयात न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. परंतु इतर प्रकरणांमधील सुनावणी असल्याने या प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नाही, त्यामुळे न्यायालयाने सुनावणी 14 जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. तसेच ईडीच्या कारवाईपासून दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवले आहे.