बिद्री साखर कारखाना निवडणुकीच्या आखाड्यात स्वाभिमानीची उडी

कोल्हापूर : दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीच्या पंचवार्षिक निवडणूकीचा बिगुल वाजला आहे . 218 गावाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याचे सुमारे 55 हजार पेक्षा जास्त सभासद आहेत. या निवडणुका आखाड्यात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही उडी घेतली असून यासंदर्भात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.

बिद्री साखर कारखाना निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.याबाबत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार संजय मंडलिक यांनी बिद्रिची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे. याला आमदार हसन मुश्रीफ यांनी दुजोरा देत बिद्रीची निवडणूक बिनविरोध होणार असेल तर आपण सर्वांचे स्वागत करू अस म्हटलय.बिद्रीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ज्यावेळी ऊस दराची कोंडी फोडायचे काम के. पी .पाटील यांनी केले, दर चांगला दिला त्यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी के. पी .पाटील व संचालक मंडळाचा सत्कार केला. बिद्रीच्या ऊस वजन काट्यावर समाधान व्यक्त करीत त्यांनी सत्ताधाऱ्यांना सहकार्य केले. सध्या आपण कुठे आहोत हे तपासणे गरजेचे असल्याने बिद्रीची निवडणूक लढवण्याचा चंग स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बांधला आहे.