सिटूच्या आंदोलनाला यश 

418
राशिवडे (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांना तीन हजार रुपये कोविड अनुदान देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. खासदार शरद पवार तसेच सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या उपस्थितीत कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, जिल्हा सचिव शिवाजी मगदूम, राधानगरी तालुकाध्यक्ष संदीप सुतार यांनी दिली.

डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना शिष्टमंडळ भेटून चर्चा केली होती. त्याअनुषंगाने पवार यांनी पुढाकार घेऊन मंत्री वळसे-पाटील, सिटुचे डॉ. कराड तसेच अन्य कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. त्याअनुषंगाने राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला.
बांधकाम कामगारांना पंधरा हजार रुपये कोविड अनुदान द्या, या मागणीसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटना (सिटू) ने महाराष्ट्रभर आंदोलने केली होती. याशिवाय मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री वळसे-पाटील यांच्यासोबत या मागणीसंबंधी पत्रव्यवहारसुद्धा केले होते. त्याअनुषंगाने आज झालेला हा निर्णय आहे.
बैठकीला सिटूचे राज्याध्यक्ष डॉ. कराड, विश्वास उटगी, संजय वढावकर, एम ए.पाटील, दिवाकर दळवी आदी उपस्थित होते. अशी माहिती लाल बावटा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष भरमा कांबळे, जिल्हा सचिव शिवाजी मगदूम,राधानगरी तालुका अध्यक्ष संदीप सुतार यांनी दिली.