आणि त्यांना लग्न पडलं महागात…

302

पुणे: पुण्यात एका लग्नात जाणं वऱ्हाडींना चांगलंच अंगाशी आलं आहे. या लग्नाला हजर असलेल्या २५० वऱ्हाडींपैकी २५ वऱ्हाडीना कोरोनाची लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर हॉटेलला नोटीस पाठवण्यात आली असून ५० लोकांना लग्नाला हजेरी लावण्याची परवानगी असताना २५० लोक या लग्नात सामिल झालेच कसे? असा सवाल विचारण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.३० जून रोजी पुण्यातील पुणे-नगर रोडवरील रिजन्सी नावाच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा धुमधडाक्यात पार पडला. या लग्न सोहळ्याला केवळ ५० लोकांना हजर राहण्याची मुभा असताना २५० लोकांनी हजेरी लावली.

लॉकडाऊनचे सर्व नियम धाब्यावर बसवून हा लग्न सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याला एकावेळी २५० लोक एकत्र आल्याने करोना संसर्गाचा फैलाव झाला. त्यातील २५ जणांना करोनाची लागण झाली आणि दोघांचा करोनाने मृत्यू झाला आहे. या लग्नाची माहिती मिळताच त्याविरोधात शिवसेनेचे उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर कपिल राजेश गर्ग आणि विशाल उमेशचंद्र तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच जिल्हा प्रशासनाने हॉटेलच्या मालकाला नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे.मुंबईनंतर पुण्यात कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. कडक लॉकडाऊन केल्यानंतरही पुण्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी गाइडलाइन जारी करूनही त्याचं पालन होत नाही. त्यामुळे इतरांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे.