कोल्हापूर शहरातील तालमींना निधी द्या : आमदार जयश्री जाधव

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील तालमी व तालीम संस्थामध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व दुरुस्तीच्या कामासाठी, विशेष बाब म्हणून भरघोस निधी द्यावा अशी मागणी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

जिल्हा नियोजनाच्या बैठकीत कोल्हापूर शहरातील तालीम संस्थांना मूलभूत सोई सुविधा व तालीम बांधकामासाठी भरीव निधीची तरतूद करण्याचे आश्वासन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी कोल्हापुरात झालेल्या बैठकीत आश्वासन दिले होते. त्यामुळे आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मंत्रालय, मुंबई येथे पालकमंत्री केसरकर यांची भेट घेऊन, निवेदन दिले.

निवेदनात दिलेली माहिती अशी, माझ्या विधानसभा मतदारसंघातील तालमी व तालीम संस्थाना मोठा इतिहास आहे. पैलवान व खेळाडू घडवण्याबरोबरच समाजातील वाईट प्रवृतींचा नाश करणारे संस्कार व विचार या तालमीतून दिले जातात. यामुळे तरूण पिढी निर्व्यसनी व निरोगी बनते. तालमींच्या इमारती ह्या इतिहासाच्या अनेक घटनांच्या साक्षीदार आहेत. कोल्हापुरच्या ऐतिहासिक परंपरेत या तालमीचे महत्त्व अन्यसाधारण आहे.कोल्हापूर शहरातील तालमीमध्ये राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून सधन व गरीब घरातील युवक केवळ कुस्तीकरिता तसेच तालीम संस्थांमध्ये फुटबॉल खेळण्याकरिता येतात. नव्या दमाचे मल्ल घडविण्यात कोल्हापुरातील तालमी आघाडीवर आहेत. तसेच तालीम संस्थामधून उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू तयार होत आहेत. विविध कुस्ती व फुटबॉल स्पर्धेत कोल्हापुरातील मल्लांनी व फुटबॉल खेळाडूंनी बक्षीस मिळवली आहेत. परंतु कोल्हापुरातील या तालमी व तालीम संस्था मूलभूत सोयी सुविधा पासून वंचित आहेत. यामुळे पैलवान व फुटबॉल खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे. तरी कोल्हापूर शहरातील सर्व तालमी व तालीम संस्थामध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व दुरुस्तीच्या कामासाठी, विशेष बाब म्हणून भरघोस निधी मंजूर करून द्यावा आणि कुस्तीगीर व क्रीडा प्रेमींना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.कोल्हापूर शहरातील तालीम संस्थांना मूलभूत सोयीसुविधा ऊपलब्ध करणेसाठी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिले. तसेच जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना निधी वितरण करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.