खा. राहुल गांधी सर्व विरोधकांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील….

दिल्ली: खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेत जे कष्ट घेत आहेत, ते पाहून हे निश्चित वाटते की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते केवळ विरोधी पक्षांचा चेहरा असतील असे नाही, तर ते सर्व विरोधकांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, असे वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केले आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्वाची कमलनाथ यांनी स्तुती केली आहे. गांधी परिवार हा एकमेव परिवार आहे, ज्याने या देशासाठी खूप मोठे बलिदान केले आहे.त्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व राहुल गांधी करतात. जगाच्या इतिहासात सर्वात मोठी ठरेल, अशी पदयात्रा राहुल गांधींनी काढली आहे. 3 हजार किलोमीटर पेक्षा जास्त ही पदयात्रा असेल. त्यामुळे राहुल गांधींची प्रतिमा संपूर्ण देशात उजळली आहे. तिचा लाभ 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस बरोबर सगळ्या विरोधकांना होईलच. राहुल गांधी हे फक्त सगळ्या विरोधकांचा एक चेहरा असतील असे नव्हे, तर ते पंतप्रधान पदाचे उमेदवार देखील असतील, असे कमलनाथ यांनी स्पष्ट केले आहे.