अद्यापही ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान न मिळालेल्या निम्म्या शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार? आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी निम्म्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. उर्वरित निम्म्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे हे प्रोत्साहनपर अनुदान कधी मिळणार? असा सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी नागपूर अधिवेशनामध्ये सरकारला केला.

आमदार मुश्रीफ यांनी लक्षवेधीद्वारे मांडलेल्या शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. उत्तरात फडणवीस म्हणाले, ज्यांची कागदपत्रे पूर्ण होती, त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना हे अनुदान दिले आहे. अजून तीन लाख शेतकऱ्यांना द्यावयाचे आहे. जानेवारी महिन्याअखेर कागदपत्रे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना पैसे देऊ. ही योजना बंद करणार नसून त्यानंतरही यादीतील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पैसे देणार असल्याची हमी उपमुख्यमंत्र्यांनी दिले.