कुंभी कारखान्याची निवडणुक विरोधक एकत्रित लढवणार

करवीर (प्रतिनिधी) : कुडित्रे (ता.करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत सर्व हेवेदावे विसरून एकत्र आव्हान निर्माण करण्याचे शाहू आघाडीच्या मेळाव्यात ठरले. अध्यक्षस्थानी कुंभीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील होते.

कोपार्डे (ता. करवीर) येथे सिध्दी विनायक हॉलमध्ये विरोधी शाहू आघाडीच्या नुकताच मेळावा झाला. मेळाव्यात प्रमुख नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कुंभी-कासारी साखर कारखान्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करूया असे ठरवले.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत चुकी झाली ती होऊ नये यासाठी शाहू आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न करू असे बैठकीत ठरले. भवितव्यासाठी सत्ताधारी गटाच्या विरोधात विरोधक म्हणून या निवडणुकीत मतप्रवाह वेगळे असले तरी एकत्र येण्याचा विरोधी शाहू आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आज एक वाक्यता झाली. यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांची एकी झाली आहे.

यावेळी बोलताना संजय पाटील म्हणाले कि, तुमच्या राजकीय तडजोडीत सर्वसामान्य विरोधी कार्यकर्त्याचा जीव जात आहे. सभासद असूनही आंदोलन केल्याशिवाय काही मिळत नाही.

यावेळी बोलताना गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले कि, मी बचाव मंच स्थापन केला तो राजकारणासाठी नाही. गेल्या दहा वर्षापासून कुंभी कासारी कारखान्यात चाललेल्या चुकीच्या कारभाराने ५० हजार शेतकरी सभासद, कामगार व तोडणी वाहतूक लोकांचे जीवन उध्वस्त होणार आहे. सभासदांच्यात जागृती करण्याचे काम केले. कुंभीच्या भल्यासाठी एकत्र येऊन काम करण्याचे स्पष्ट केल्याने बचाव मंचकडून वेगळी भूमिका मांडली जाईल याला पूर्ण विराम मिळाला.

यावेळी बाजीराव देवाळकर यांनी कुंभी कासारीच्या भल्यासाठी एकच पँनेल करून शाहू आघाडीने निवडणूक लढवावी असे आवाहन केले.

यावेळी यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी आताच नेता जाहीर करता येणार नाही. प्रथमतः सुकाणू कमिटी नेमून आणखीन चार दिवसांनी नेता निवडीला वेळ द्या असे आवाहन केले. दरम्यान,बाळासाहेब खाडे यांनी आपण निवडणूक लढवणार नाही. पण सुकाणू कमिटीत काम करून चांगले पँनेल तयार करूया असे सांगितले.

यावेळी कुंभीचे दोन माजी अध्यक्ष संभाजी पाटील, सर्जेराव पाटील, माजी संचालक एस. के.पाटील, शेतकरी संघटनेचे दादू कामिरे, जयसिंग हिर्डेकर यांची सुकाणू कमिटी नेमण्यात आली.