शिंदे सरकार चार -सहा महिने टिकेल: सुषमा अंधारे

मुंबई : सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे सरकार जास्तीत जास्त सहा महिने टिकेल हे भाकीत वर्तवलं. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे नाराज आहेत. त्याबाबत सुषमा अंधारे यांना विचारण्यात आलं. त्यावर, त्यांच्यातील नाराज आमदार आमच्यात येतील. तसं चित्रं दिसत आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

सुहास कांदे यांनी अगदी स्पष्ट भूमिका मांडली आहे. दादा भुसेंवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काल सुहास कांदेंनी खदखद व्यक्त केली. यापूर्वी अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या दालनातून चिडचिड करत बाहेर आले होते. चौकशी टाळण्यासाठी प्रताप सरनाईकांनी पक्ष बदलला. पण तरीही त्यांच्या मागचा चौकशीची ससेमिरा सुटलेला नाही.सरनाईक त्यांचा मतदारसंघ भाजपला सोडत नाही, तोपर्यंत भाजप त्यांना मोकळेपणाने श्वास घेऊ देणार नाही. या सर्व कारणाने हे सरकार कोणत्या दिशेने जातंय हे स्पष्ट होतंय, असं त्या म्हणाल्या.हे असंच कुरघोड्यांचं राजकारण आणि माणसांना ओलीस ठेवण्याचं राजकारण सातत्याने सुरू राहणार असेल तर हे सरकार जास्त काळ टिकेल असं वाटत नाही. माझ्या निरीक्षणानुसार फार फार चार सहा महिने हे सरकार चालू शकेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं.