२५ हजारांची लाच घेताना शिक्षणाधिकारी किरण लोहार जाळयात

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी शिक्षणाधिकारी लोहार यांना रंगेहाथ पकडले.

पाचवी ते आठवीचे वर्ग वाढण्यासाठी एका स्वयंअर्थसहाय शाळेने वर्गवाढीच्या परवानगीची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे केली होती. त्याचा आयडी देण्यासाठी ५० हजारांची लाच शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी मागितली. सुट्ट्यांमुळे पैसे द्यायला थोडा विलंब झाला होता. सोमवारी तक्रारदाराला कार्यालयात बोलावून त्याच्याकडून २५ हजार रुपये स्वीकारले. त्यावेळी परिसरात दबा अधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार यांना रंगेहाथ पकडले.

किरण लोहार यांच्या सोबतच एका लिपिकास यावेळी पकडण्यात आले आहे. किरण लोहार यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा पदभार घेऊन साधारण 13 महिने झाले होते मात्र त्यांच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे कामकाज पाहिले तर कायमच वादग्रस्त राहिले आहे. कोणतीही फाईल वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नव्हती अशा तक्रारी वारंवार ऐकण्यास मिळत होत्या. शेवटी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा हातोडा पडलाच.

या प्रकरणातील तक्रारदार यांची उत्तर सोलापूर तालुक्यात एक स्वयं अर्थसहाय्य शाळा आहे त्यांच्या यूडायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी यांनी २५ हजार देण्याचे ठरले मात्र तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली सोमवारी जिल्हा परिषदेच्या त्यांच्या कार्यालयात पावणे सहा वाजता त्यांना २५ हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कामकाज वादग्रस्त
लोहार यांची तेरा महिन्यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषद येथे बदली झाली होती. यापूर्वी त्यांनी रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हा परिषद येथे काम केले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद येथील त्यांचा कामकाज वादग्रस्त ठरले होते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या कामकाजावर टीकेची झोड उठविली होती. त्यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव ही कोल्हापूर जिल्हा परिषदेने केला होता. सप्टेंबर २०१८ मध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयाने त्यांच्यावर कारवाई करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक या दोन्हीपदावरुन कार्यमुक्त केले. नंतर लोहार यांनी या कारवाईच्या विरोधात कायदेशीर लढा देत कारवाईला स्थगिती मिळवली होती. लोहार यांची तेरा महिन्यापूर्वी सोलापूर येथे बदली झाली होती.