अजित पवारांचा ‘त्यावरून’ फडणवीसांनी खोचक टोला

पुणे प्रतिनिधी : माझ्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकीनऊ आलं होतं, ते सहा जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार आहेत? असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. बारामतीत बारामती सहकारी बँकेच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, शनिवारी शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची घोषणा केली. काही जिल्ह्यांमध्ये एकच पालकमंत्री दिले आहेत. तर काही पालकमंत्र्यांकडे दोन जिल्हे दिले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्हे देण्यात आले आहेत. माझ्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकीनऊ येत होतं. आठवड्यातून किमान एक दिवस मला जिल्ह्यासाठी द्यावाच लागत होता. त्यामुळे ज्यांच्याकडे सहा-सहा जिल्हे दिले आहेत, ते त्यांना कसं पेलवणार आहे, हे मला माहीत नाही, परंतु त्यांना माझ्या शुभेच्छा, असं अजित पवार भाषणात म्हणाले आहेत.