पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक

कोल्‍हापूर प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा स‍हकारी दूध उत्‍पादक संघ लि.,कोल्‍हापूर (गोकुळ) काल शनिवारी लंम्पीस्कीन उपचार व लसीकरण याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात चेअरमन विश्‍वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.

यावेळी बोलताना चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि, लंम्पी त्वचा रोगावरील लसीकरणा संदर्भात गोकुळ व शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने सामुदाईक काम करणे गरजेचे आहे. शासकीय अधिकारी व गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यात समन्वय साधून बैठक घेणे व वस्तुनिष्ठ माहितीची चर्चा होणे महत्त्वाचे आहे. यामुळे जिल्ह्यातील लंम्पी लसीकरणाची मोहीम वेगाने पूर्ण होईल. १५ ऑक्टोबर पासुन जिल्ह्यातील साखर कारखाने चालू होणार असून इतर जिल्ह्यातील ऊस वाहतुकीसाठी बैले व इतर जनावरे जिल्ह्यात येणार आहेत. येणाऱ्या जनावरांची योग्य ती नोंद घेवून लसीकरण करण्यासाठीचे नियोजन करावे व खास करून शिरोळ, हातकणंगले,पन्हाळा,शाहूवाडी तालुक्‍यात व कर्नाटक सीमा भागातील संघाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रामुख्याने लक्ष्‍य देण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी पशुसंवर्धन उपआयुक्त वा.ए.पठाण यांनी गोकुळ दूध संघ, दूध उत्पादक,शासन हे शेतकऱ्यांसोबत आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून बाधित जनावरे इतर जनावरांपासून वेगळी करावीत. गोठ्याची साफसफाई, स्वच्छता करावी. गोचिड व माशांचा बंदोबस्त करावा. जनावरांवर उपचार कसे करुन घ्यावेत. यासंदर्भात मार्गदर्शन केले व जिल्ह्यातील लंम्पी रोगासंदर्भात केलेल्या उपायोजना नियोजनांची माहिती दिली.

या आढावा बैठकीत माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे व संचालक शशीकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके, संचालिका शौमिका महाडिक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद पवार व संघाचे अधिकारी यांनी लंम्पी संदर्भात विविध विषयावर सवांद साधला.

यावेळी संचालक किसन चौगले, रणजितसिंह पाटील,नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील,बयाजी शेळेक, बाळासो खाडे, शौमिका महाडिक, तज्ञ संचालक विजयसिंह मोरे, शासन नियुक्त संचालक मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ.यु.व्‍ही.मोगले, सहा.व्‍यवस्‍थापक डॉ.पी.जे.साळुंके,सहा.व्‍यवस्‍थापक डॉ.प्रकाश दळवी, पशुवैद्यकीय अधिकारी, एल.एस.एस. व कृत्रिम रेतन सेवक उपस्थित होते.