समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांची अनुदानित वसतिगृहांना अचानक भेट

कुडित्रे (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृहांना समाजकल्याण विभागाच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षकांनी अचानक भेट देऊन विद्यार्थिनीशी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या.

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुदानित व स्वयंसेवी संस्था मार्फत चालवल्या जाणाऱ्या अनुदानित वसतिगृहातील सोयी सुविधा मध्ये वाढ करणे व अडीअडचणींचा मागोवा घेण्यासाठी समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे संवाद उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ४६ अनुदानित वसतिगृहांना भेट देऊन अडीअडचणी जाणून घेतल्या. तपासणी अधिकारी यांनी विद्यार्थिनींसोबत सायंकाळी जेवण करून मुक्काम केला. तसेच विद्यार्थिनींची दिनचर्या जाणून घेतली. विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याबाबत विद्यार्थिनींशी हितगुज केले.

या तपासणीमध्ये आढळलेल्या उणीवा व चांगल्या बाबीबाबत तपासणी करून अधिकारी व अधिक्षिका यांचे एकत्रित चर्चासत्र ठेवले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या गुणवत्तेत वाढ होईल तसेच या उपक्रमाबाबत विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले असे समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी सांगितले.