‘या’ ईडी कार्यालयात दाखल; संजय राऊत आणि ‘त्यांची’ समोरासमोर चौकशी

मुंबई : गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून चौकशीस हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर आज वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे.

ईडीने वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून जवळपास ३ कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलवले असून त्यांच्या खात्यात हा पैसा आला कुठून? कशासाठीचे हे पैसे आहेत? त्या मागचा स्त्रोत काय? आदी माहिती ईडी वर्षा राऊत यांच्याकडून घेणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय राऊतांच्या परदेश दौऱ्याचा खर्च आम्ही तपासत असून राऊतांशी संबंधितांना नोटिसा पाठविण्यात आल्याचे ईडीने सांगितले होते.

दरम्यान, वर्षा राऊत यांची आधी ४ जानेवारीला पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने चौकशी केली होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली होती. ईडीच्या नोटीशीनंतर राऊत यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून मागितली होती.