एकनाथ शिंदेंची भूक अजून भागली नाही का? : ‘यांची’ टीका

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडलं आणि स्वत: मुख्यमंत्री झाले. त्यांच्या शपथविधीला आता महिना होत आला आहे तरी त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यासंदर्भात त्यांनी दोनदा दिल्ली दौरे देखील केले. त्यात भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत त्यांच्या बैठका झाल्या. खाते वाटपाबाबत त्यांनी अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही.

रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावर आता माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भूकंप भूकंप करत त्यांनी सत्ता मिळविली, मग आता मंत्रीमंडळ विस्तार का करत नाही? तुम्हाला बहुमत आहे तर मंत्रीमंडळ का स्थापन करत नाही? एकनाथ शिंदे यांना बहुमताची भूक लागली आहे. त्यांना अजून किती लोक फोडायचे आहेत? असे प्रश्न त्यांनी विचारलेत.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातात काही आहे, असं दिसत नाही. त्यांना दिल्लीत जाऊन हिरवा झेंडा घेऊन यावा लागतो आहे. आता तुम्हाला बहुमत मिळालं आहे, तेव्हा लवकर खातेवाटप करा आणि अधिवेशन घ्या. राज्यातील अनेक भागात पावसाने मोठं नुकसान केलं आहे. अशा वेळी जिल्ह्यांना पालकमंत्री असायला हवा. तो लवकरात लवकर निवडा आणि लोकांच्या कामाला लागा, असं पवार म्हणाले.

यावेळी अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांच्या काळजावर दगड ठेवला या वक्तव्याची देखील चांगली फिरकी घेतली. तुम्ही दगड कुठे ठेवावा, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. त्यात मी काही भाष्य करणार नाही. नुकत्याच त्यांच्या आई वारल्या आहेत त्यामुळे ही योग्य वेळ नाही, असं पवार म्हणाले. तसेच त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या आईला श्रद्धांजली देखील वाहिली.