सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी

मुंबई: सीबीएसई बोर्डाचा (CBSE Bord) बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदाच्या सीबीएसईच्या निकालात मुलींनी उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुलांपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे. यात ९४.५४ टक्के विद्यार्थिनी आणि ९१.२५ टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. तर जवाहर नवोदय विद्यालयाचा (Jawahar Navodaya Vidyalaya) निकाल ९८.९३ टक्के लागला असून केंद्रीय विद्यालयाचा (CBSE) निकाल ९७.०४ टक्के इतका लागला आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र बोर्डाने दहावी व बारावीचानिकाल जाहीर केला होता. यानंतर सीबीएसई बोर्डाच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली होती. त्यानंतर आज सीबीएसई बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल बघता येणार आहे. याशिवाय डिजीलॉकरच्या वेबसाइट किंवा अ‍ॅपवर जाऊनही निकाल तपासता येणार आहे.

आज दुपारी दोन वाजता सीबीएसई बोर्डाच्या दाहावीचा निकाल देखील जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत बोर्डाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. तसेच कोविड-१९ मुळे सीबीएसईने यावेळी दोन टर्ममध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या होत्या. टर्म १ च्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये आणि टर्म २ च्या परीक्षा एप्रिल ते जून २०२२ मध्ये घेण्यात आल्या होत्या.