कोरोना संसर्गाचा धोका असूनही कोरोना वॉर्डात कार्यरत असलेला स्वच्छता दूत म्हणजे अमोल ईसापूरे…! 

0
383

कोल्हापूर (रोहित कांबळे) : सेवेत कायम होण्याची शाश्वती नाही. कारण तो काम करतोय सीपीआरच्या स्वच्छता ठेका घेतलेल्या संस्थेकडे…! पण तो कर्तव्य बजावतोय सीपीआरच्या कोरोना वॉर्डात एक स्वच्छता कर्मचारी म्हणून…! थेट कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात राहून या वॉर्डाची स्वच्छता करताना संसर्गाचा धोका कायम असलेला, तरीही कर्तव्य भावनेतून कोरोना वॉर्डामध्ये काम करणे धाडसाचेच काम आहे आणि हा धाडसी तरुण म्हणजे अमोल मोहन ईसापूरे…!

दीड महिन्यांपूर्वी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सीपीआर मध्ये कोरोना वॉर्ड सुरू करण्यात आला. त्यावेळी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी उत्स्फूर्तपणे आपले नाव नोंदवणाऱ्या लोकांमध्ये अमोलचा समावेश होता. तेंव्हापासून अमोल या कोरोना वॉर्डामध्ये आपली सेवा बजावत आहे. अर्थात यासाठी अमोलला त्याच्या कुटुंबाचे भरभक्कम प्रोत्साहन असल्यानेच तो कोरोना विरोधातील या लढ्यात एक योद्धा बनून कार्यरत राहिला आहे.

स्वतः जीव कोणाला प्यारा नाही. पण कोरोनासारख्या अशा महाभयंकर संकटातही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांच्या जीवाची काळजी करत त्यांची सेवा करणारे अमोल सारखे अनेक कर्मचारी या ठिकाणी आहेत. अशा सेवाभावी वृत्तीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी सेवेची सीपीआरच्या प्रशासनासह जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी नोंद असायला हवी. कारण नोकरी प्रत्येक जण करतो, पण आपत्कालीन परिस्थितीत गरज असताना आरोग्य प्रशासनाच्या हाकेला तत्परतेने ओ देणारे अमोल सारखे कर्मचारी आज सीपीआरला हवे आहेत एवढे मात्र नक्की…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here