औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला ‘यामुळे’ स्थगिती

मुंबई : ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे सरकार आले. शिंदे सरकार राज्यात येताच ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णायालादेखील शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. हा उद्धव ठाकरे यांना जबर झटका मानला जात आहे.

शिंदे सरकारने राज्यपालांना बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत नामांतराला स्थगिती दिली आहे. ठाकरे सरकारने सरकार कोसळणार असल्याचे लक्षात येताच औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि. बा. पाटील असं नामांतर करण्याचा ठराव शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर केला होता. मात्र, राज्यात शिंदे सरकार येताच ठाकरे सरकारने घेतलेले अनेक निर्णय स्थगित करत आहे.

नामांतराचे निर्णय पुन्हा नव्याने घेणार
सरकारने राज्यपालांना बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. हाच मुद्दा पुढे करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराच्या मुद्द्यावर आक्षेप घेतला होता. हे तीनही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.