अलमट्टी धरणातून १लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

कोल्हापूर : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून १ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

एक दिवसापूर्वी अलमट्टी धरणातून विसर्ग जेमतेम 450 क्युसेक्स सुरू होता. धरणात 83.8 हजार दशलक्ष घनफूट (टीएमसी) पाणीसाठा होता. अलमट्टी धरणाची एकूण क्षमता 123 टीएमसी आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत असून ती आता 18 फुटांवर गेली आहे. कोयना धरणातून कृष्णेच्या नदीपात्रात विसर्ग सुरू झालेला नाही. मात्र कोल्हापूर, सांगली तसेच सातार्‍यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सांगलीत पाणी भरले की सगळ्यांच्या नजरा लागतात ते अलमट्टी धरणाकडे. हे धरण कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील निडगुंडी येथे आहे. तब्बल 125 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण 525 फूट उंच आणि 1565 फूट लांब आहे.