दोन वर्षानंतर कडगावात रंगला आषाढी एकादशी दिंडी सोहळा

कडगाव (प्रतिनिधी) : श्री विठ्ठल गणेश तरुण मंडळ कडगाव संचलित श्री विठ्ठल भजनी मंडळ तसेच वारकरी संप्रदाय कडगाव यांच्या आयोजनाने दरवर्षी आषाढी एकादशी दिंडी सोहळा आयोजित केला जातो मागील दोन वर्षांमध्ये कोरोना महामारी असल्यामुळे हा सोहळा होऊ शकला नव्हता पण यंदा काही निर्बंध नसल्याने मोठ्या उत्साहात कडगाव येथे आषाढी एकादशी दिंडी सोहळा पार पडला.

       यावर्षी श्री व सौ नितीन पांडुरंग माळवी यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीचा अभिषेक व महापूजा झाली त्यानंतर गावातील वारकरी संप्रदाय तसेच गावकरी यांच्यामार्फत नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. दिंडीमध्ये गावच्या मध्यवर्ती असणारे जुने बस स्थानक येथे गोल रिंगण पार पडले.           

 आबाल वृद्ध या रिंगण सोहळ्यात अभंगाच्या तालावर मोठ्या उत्साहात तल्लीन झाले. यावर्षी मंदिरामध्ये नितीन माळवी व जनार्दन मोकाशी यांच्याकडून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच सायंकाळी हभप बबन बेलकर महाराज गारगोटीकर यांचा सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. गावातील अनेक तरुण मंडळांनी दिंडीतील लोकांना उपवासाचे पदार्थ वाटप केले द्वादशी रोजी विठ्ठल गणेश तरुण मंडळ कडगाव यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दोन वर्षांनी होत असलेल्या या दिंडी सोहळ्याला गावातील व पंचक्रोशीतील भाविकांनी अलोट गर्दी केली होती.