प्रयाग चिखलीच्या पूरग्रस्तांना दीड कोटीची मदत

प्रयाग चिखली (वार्ताहर) : सन २०१९ सालच्या महापुरात घरांची पडझड झालेल्या प्रयाग चिखलीच्या १०१ पूरग्रस्तांना सुमारे एक कोटी ५६ लाख रुपयांच्या मदत रक्कमेच्या वाटपाचा कार्यक्रम करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते प्रयाग चिखली येथे पार पडला. यावेळी तहसीलदार सौ. शीतल मुळे –भामरे, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 पूरग्रस्तांसाठी शासनाकडून तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेली मदत रक्कम नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मिळण्यात शासनाच्या काही अधिकारी लोकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अनेक अडचणी आल्या. या दरम्यान करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांनी गावच्या तलाठ्यापासून राज्याच्या सचिव पातळीपर्यंत  पाठपुरावा केल्यामुळे दीर्घ कालावधीनंतर पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.

यावेळी घराची पूर्णता पडझड झालेल्या लोकांना 95 हजार रुपयाची मदत तर अंशतः पडझड झालेल्या नुकसानग्रस्तांना सहा हजार रुपयाची मंजूर झालेल्या मदतीची पत्रे पूरग्रस्तांना आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.

पी. एन. पाटील म्हणाले, सरकार कोणतेही असो आपत्तीमध्ये आपण खंबीरपणे पूरग्रस्तांच्या पाठीशी राहू.

यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, चिखलीचे संभाजीराव पाटील, रघुनाथ पाटील यांचीही भाषणे झाली. पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी चिखलीचे शिवाजी कवठेकर यांनी परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन केवलसिंग रजपूत तर आभार  धनाजी चौगले यांनी मानले.

यावेळी चिखलीचे पांडबा यादव, रघुनाथ पाटील, पै. संभाजीराव पाटील, सेवा संस्थेचे चेअरमन -बटू सिंग राजपूत, सर्जेराव शिपेकर, बाळासाहेब वरुटे, बी. आर. शिंदे, अभिजीत पाटील-भुयेकर, प्रभाकर पाटील, विठ्ठल पाटील, तलाठी श्रीकांत नाईक, ग्रामसेवक दिनकर गिरीगोसावी

मदतीपासून साठ पूरग्रस्त वंचित…

दरम्यान २०१९ सालच्या महापुरात घरे पडलेल्या १६१ लोकांना शासनाकडून 95 हजाराची मदत मंजूर झाल्याची यादी त्याचवेळी जाहीर झाली होती. मात्र त्यापैकी फक्त १०१ लोकांना मदत मिळाली. अद्याप साठ नुकसानग्रस्त पूरग्रस्तांना मदत मिळालेली नाही. वंचित लोकांच्याकडून आमदार पी. एन. पाटील तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडे याबाबत मागणी केली. मात्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लावलेल्या निकषामुळे साठ लोक वंचित राहिल्याचे सांगण्यात आले.