आगामी तीन दिवस अतिवृष्टी; नागरिकांना सावधानतेचा इशारा

कोल्हापूर : भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्याकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार 9 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: 8 जुलै पर्यंत रेड अलर्ट व 9 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जिल्ह्यात याच पध्दतीने पाऊस सुरु राहिला तर पंचगंगा,  दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या सर्व नद्या सद्य: स्थितीत इशारा पातळीपर्यंत दि. 7 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. वेधशाळेने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ संभवत असून पाणी पातळीमध्ये 5 ते 6 फुटांची वाढ होऊन दिनांक 7 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत किंवा आधी पाणी पातळी धोका पातळीस पोहचण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी या इशाऱ्यानुसार सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणानी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भू:स्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरिकांनी आवश्यकती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येत आहे.

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या २४ तासात ७ फुटांनी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी २१.६ फुट असून इशारा पटली ३९ फुट एवढी आहे. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने झालेली वाढ आणि पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता NDRF च्या दोन तुकड्या तेनात करण्यात आल्या आहेत. तसेच नदी काठावरील लोकांना सातत्याने सतर्कतेच्या सूचना देण्यात येत असून स्थानिक शोध व बचाव पथके तैनात करण्यात आली आहे.