शिक्षक बँकेत परिवर्तन अटळ : प्रसाद पाटील


कोल्हापूर (प्रतिनिधी) : सत्ताधारी मंडळींनी सभासदांना १५ वर्षे हक्काच्या लाभांश व ठेवीच्या व्याजापासून वंचित ठेवून सभासदांचे लाखो रूपयांचे नुकसान केले आहे. आणि या सात वर्षात आम्ही प्रामाणिकपणे बजावलेल्या चोख विरोधी भुमिकेमुळेच बँकेतील गैरखर्चांना आळा बसून कर्जावरील व्याजदर १० टक्केपर्यंत खाली येऊन या पाच वर्षात सरासरी अडीच कोटींच्यावर विक्रमी नफा झाल्याने सभासदांना समाधानकारक डिव्हिंडंड व व्याज मिळत आहे. आमच्या विरोधी भुमिकेमुळे सभासदांना झालेल्या लाखो रूपयांच्या फायद्यामुळे सभासद या निवडणुकीत आमच्या पँनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन परिवर्तन नक्की करतील, असा ठाम विश्वास पँनेल प्रमुख प्रसाद पाटील यांनी व्यक्त केला.

प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या निवडणुकीत ‘आप’लं पुरोगामी – समिती – संघ – समविचारी परिवर्तन पँनेलच्या शाहुवाडी तालुक्यातील संपर्क दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रसाद पाटील म्हणाले, सभासदांच्या भावनेचा विचार करून सर्व विरोधक एकवटून सत्ताधारी विरोधात एकास एक पँनेल देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. पण विरोधक एकवटू नयेत, असे वाटणाऱ्या काही नेत्यांनी युतीमध्ये खोडा घातला आहे. यांनी आम्हाला चार महिने फक्त चर्चेचा फार्स करून झुलवत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभासदांच्या हितासाठी व सभासदांच्या आग्रहाखातर ‘आप’ लं पुरोगामी – समिती – संघ – समविचारी परिवर्तन पँनेलचा ठेवलेला सक्षम पर्याय सभासद नक्की स्विकारतील. जाहीर झालेल्या आमच्या पॅनेलसोबत शिक्षक समिती, शिक्षक संघ, प्रहार शिक्षक संघटना व शिक्षक सेना सहभागी असल्याने पँनेलची ताकद वाढली आहे.
पुरोगामी शिक्षक संघटनेने बँक वाचवण्यासाठी व सभासदांच्या हितासाठी अनेक घाव सोसत सातत्याने २० वर्षे केलेला संघर्ष आणि शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसर राहून केलेल्या उठावदार कार्यामुळे जिल्ह्यातील सर्व सभासद आमच्या पँनेलच्या मागे भक्कमपणे उभे राहून आमचे पँनेल प्रचंड मतांनी विजयी करतील, असा विश्वास आहे.

   

यावेळी पॅनेलचे उमेदवार गोविंद पाटील, शंकर पवार, सुरेश कांबळे, संपत पाटील, अशोक शिवणे, सुरेश हुली, तानाजी पावले, शारदा वाडकर, वासंती आसवले, अलका थोरात, सुनिता पाटील, हिंदुराव हारूगडे, जयशंकर जवादे, शरद पाटील, कृष्णा पोवार आदी शिलेदार उपस्थित होते.