मंत्री हसन मुश्रीफ यांनी लोकांना बेघर केले – समरजित घाटगे

कागल (प्रतिनिधी) : स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी स्वतःचे घर नसलेल्या बेघर लोकांना आपली जमीन दिली. तेथे लोकांनी आपली घरे बांधली.बेघर वसाहतीस शाहूनगर नाव दिले. मात्र गेली तेवीस वर्षे मुश्रीफ हे आमदार व मंत्री असूनही या जागा त्यांच्या नावावर केल्या नाहीत .त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी खऱ्या अर्थाने शाहूनगर वसाहतील लोकांना बेघर केले असा घणाघाती आरोप शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केला.येथील शाहूनगर वसाहत येथे राजे फाउंडेशनमार्फत आयोजित ई- श्रम कार्ड वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

ते पुढे बोलताना म्हणाले, शाहूनगरच्या जवळ पंचतारांकित एमआयडीसी आहे.येथील कोट्यावधी रुपयांची कामे या वसाहतीतील चारच कंत्राटदारांना मंत्री मुश्रीफ यांनी जाणीवपूर्वक दिली आहेत. शाहूनगरमध्ये अश्या प्रकारचे कंत्राट घेणारे इतर अनेक ठेकेदार असताना त्यांच्यावर अन्यायच केला आहे.आम्हाला सत्ता द्या.या चौघांऐवजी चाळीसजणांना ही कामे देतो. माझ्या स्वाभिमानी मावळ्यांनो या परिसरातील दहशत मोडून काढा.सामाजिक कार्यासाठी पुढे या.मी तुमच्या पाठीशी आहे.मंत्री मुश्रीफ स्वतःला स्वयं घोषित देवदूत,महाडॉक्टर म्हणतात. मुंबई येथे रुग्णांची ऑपरेशन करून आणली म्हणून स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेतात. मी तर म्हणतो लोकप्रतिनिधी म्हणून हे तुमचे कामच आहे. ही ऑपरेशन तुम्ही स्वतःच्या पैशातून नव्हे तर आरोग्य योजनेत घालून सरकारच्या पैशातून करून आणता.ती तर आम्हीही करतो.पण कांगावा करत नाही.

लोकांच्या आरोग्याविषयी एवढे तत्पर आहात तर इतकी वर्ष तुम्ही सत्तेत असूनही कागलमध्ये एखाद्या पंचतारांकित हॉस्पिटलची तर सोडाच व साधे डायलिसिस सेंटरही का उभारले नाही?आम्ही सत्तेत नसतानाही कागल मध्ये हॉस्पिटल सुरु केले आहे.यावेळी सचिन शिंदे म्हणाले या प्रभागामध्ये स्थानिक नगरसेवक नाही. त्यामुळे नागरिकांची कुचंबणा होते ती टाळण्यासाठी येथील नागरिकांनी आता उसना नव्हे तर स्थानिक उमेदवार निवडून द्यावा.
कार्यक्रमास राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, संचालक राजेंद्र जाधव,धरणग्रस्त संघटना जिल्हाध्यक्ष बाबुराव पाटील,मनोज गाडेकर,सनी अतवाडकर, संदीप शिंदे,आप्पासो हूच्चे,शाहू साखर कारखान्याचे संचालक सतीश पाटील,आदी उपस्थित होते.

… तर मंत्री मुश्रीफ यांची हत्तीवरून मिरवणूक काढू.

यावेळी संजय कांबळे म्हणाले,स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी कागलमध्ये स्वतःच्या जमिनी देऊन अनेकांना आसरा दिला.मात्र आपले नाव ही लावले नाही. याउलट मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासनाचा निधी व लाभार्थ्यांच्या ५० हजार रुपयातून उभारलेल्या घरकुलावर स्वतःचा मोठा फोटो लावला. या पुढे जाऊन आम्ही म्हणतो त्यांनी कागलमध्ये स्वतःची पाच गुंठे जागा जरी कुणाला दिली असेल तर दाखवावी. त्यांची आम्ही हत्तीवरून मिरवणूक काढू.