केंद्रानंतर राज्य सरकारकडूनही दिलासा; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात

मुंबई : महागाईने त्रस्त झालेल्या देशातील नागरिकांना केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून खूशखबर दिली असतानाच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनेही टॅक्स कमी करुन पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करुन राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे.

केंद्र सरकारने काल, शनिवारी पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर आज महाराष्ट्र सरकारने टॅक्स कमी केल्यानंतर राज्यात पेट्रोल 2 रुपये 8 पैसे तर डिझेल 1रुपये 44 पैसे स्वस्त झाले आहे. यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने टॅक्स कमी केल्याने आता पेट्रोलच्या दर 11 रुपये 50 पैसे तर डिझेल 9 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.

मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पंन कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.