जिल्ह्यात सोशल मिडीयावर अफवा, तेढ पसरवणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा

0
82

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सोशल मिडीयावर खोटी माहिती, अफवा, धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश तसेच कोरोनाविषयी दिशाभूल करणारी माहिती पसरवून समाजात भिती निर्माण केल्याबद्दल जिल्ह्यातील आठ जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस दलातर्फे पत्रकाद्वारे देण्यात आली.

वडगांव पोलीस ठाण्यात ‘खोची ग्रुप आवाज जनतेचा’ या व्हॉट्स ग्रुपवर कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास काही लोक जबाबदार आहेत, अशी अफवा पसरवण्यात आली. याबाबत वडगांव पोलीस ठाण्यात रामचंद्र आण्णाप्पा मडकेर (वय ३१), अमित पाटील, बंडू बंडगर (सर्व रा. खोची, ता. हातकणंगले) यांच्यावर कलम १८८, सहकलम ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्हापूरातील श्री महालक्ष्मी देवीच्या दागिन्याबाबत चुकीचा संदेश सोशल मिडीयातून पाठवून समाजामध्ये भिती पसरवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मनिषा सुहास गोंजारे (रा. गजानन महाराजनगर, कोल्हापूर) आणि शिवानी अक्षय पडवळ (रा. कुडित्रे, ता. करवीर) या दोघीं विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच मोबाईलवरुन जातीय तेढ निर्माण होईल असा मजकूर प्रसारीत केल्याबद्दल शिवाजी पेठेतील रविकिरण इंगवले यांच्यावर याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूरातील रविवार पेठेतील महात गल्लीतील महंमद जैद शौकत बागवान याने जाणीवपूर्वक तबलीक जमात निजामुद्दीन मरकतचे प्रमुख मौलाना साद कंदलावी यांना व्हॉट्सअप् वर पाठिंबा देऊन त्यांना अटक झाल्यास मुस्लिम समाजाच्या भावना भडकून जनक्षोभ निर्माण होईल असे मेसेज पाठवले. याबद्दल त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेश उर्फ भरत पटेल (वय ४४, रा. येळाणे, ता. शाहुवाडी) याने शिवसेना मलकापूर शहर या व्हॉट्स ग्रुपवर अफवा पसरवल्याबद्दल त्याच्यावर शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here