जिल्ह्यात ६४७० मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप; जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई

0
45

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाय योजना केल्या आहेत. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. 1 ते 5  एप्रिल या पाच दिवसात जिल्ह्यातील 2 लाख 85 हजार 578  शिधापत्रिका धारकांना तब्बल 6 हजार 470 टन अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी आज दिली. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ​

जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थी कार्ड संख्या सुमारे 5 लाख 57 हजार 13 आहे. या लाभार्थ्यांना एकूण 1 हजार 601 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रती कार्ड 23 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती कार्ड 12 किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे 20 रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.

तर  प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 2 रु किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रु किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जातो.कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे  39 हजार 380  क्विंटल गहू, 25 हजार 314 क्विंटल तांदूळ, तर  2 हजार 720 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर तालुक्यातील अथवा इतर जिल्ह्यातील सुमारे 443 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टीबीलिटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र  अंत्योदय आणि प्राधान्य रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती 5 किलो तांदुळ दि 10 एप्रिल पासून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेकरिता तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम कडून उचल सुरू केली असून 10 एप्रिलपासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्ये सुध्दा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई

जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here