आमदार जयश्री जाधव यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

मुंबई : कोल्हापूर उत्तरच्या जनतेने तुमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चांगले काम करा, महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत आहे, असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधव यांचे अभिनंदन केले.

कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधव यांनी मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघांच्या विकासासाठी तसेच सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी चांगले काम करा. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही देत नवनिर्वाचीत आमदार जयश्री जाधव यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले.