गोकुळला दुध संकलन आणि दैनंदिन कामकाजात सहकार्याचे रवींद्र आपटेंचे आवाहन…

0
28

कोल्हापूर (प्रतिनिधी): गोकुळ दुध संघाला दुधाचे संकलन आणि दैनंदिन कामकाजात सर्वांनीच सहकार्य करावे असे आवाहन गोकुळ दुध संघाचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या प्रसिद्धी पत्रकात म्हटल्यानुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सूचना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आहोत. खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी लागू केली आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. युद्धजन्य परिस्थितीत काही सेवा या अत्यावश्यक आहेत. त्यामध्ये दुध संकलन आणि वितरण याचा समावेश आहे. दुध हा केवळ लहान मुले, वृद्ध आणि आजारी माणसांसाठीच नाही तर सर्वांसाठी मुख्य आहार आहे. राज्यात दुधाची कमतरता भासू नये यासाठी आपल्या गोकुळ दुध संघाची यंत्रणा अहोरात्र झटत आहे. त्यांच्या या कामात जिल्हा प्रशासन आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. गोकुळ दुध संघ संकलनापासून घरपोच दुध पुरवठ्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर यामध्ये संकलन करणाऱ्या दुध संस्थांचे कर्मचारी, वाहतूक करणारे चालक, संघाचे कर्मचारी, वितरण व्यवस्था, वितरक या सर्वाना मास्क, सॅनिटायजर देण्यासोबत त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी  घेतली जात आहे.

या पत्रकात पुढे म्हटल्यानुसार, काही गावात दुध वाहतूक करणारी वाहने, संबंधित घटक, दुध संघाचे कर्मचारी या सर्वांची अडवणूक केली जात आहे. यामुळे दुध संकलन आणि दुध संघाच्या कामकाजावर याचा विपरीत परिणाम होत आहे. हीच परिस्थती राहिल्यास आपण या सर्वांची अडवणूक केली तर दुधाची वाहतूक करणारी वाहने, चालक, कर्मचारी, यातील एक घटक जरी अनुपस्थित राहिला तरी ही सेवा ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिणामी लाखो घरातील दुधाचा  पुरवठा बंद होण्याची भीती आहे. गोकुळ दुध संघाला समाजातील सर्व घटकांनी सहकार्य न केल्यास तर नाईलाजास्तव ३१ मार्च किंवा पुढील सूचना मिळेपर्यंत दुध संकलन, प्रक्रिया आणि वितरण बंद ठेवावे लागेल. अशा इशारा आपटे यांनी या पत्रकाद्वारे दिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here