इचलकरंजीत तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

इचलकरंजी : तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना इचलकरंजीतील वखार भाग परिसरात निर्जनस्थळी उघडकीस आली आहे. उदय मधुकर गवळी (वय ४०, रा. रेणुका नगर झोपडपट्टी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजीतील शहरातील वखार भाग येथे मोहन मोहन आर्केडच्या पाठीमागे पडीक जमीन आहे. तेथे आज सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह आढळून आला डोक्यात दगड घालून हा खून केल्याचे उघडकीस आले आहे. उदय मधुकर गवळी याच्यावर आजीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल असून खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनास्थळी तातडीने शिवाजीनगर पोलीस दाखल झाले असून तपास सुरु केला आहे. घटनास्थळाची अप्पर पोलीस अधीक्षक सौ. जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक बी. बी. महामुनी यांनी पाहणी केली.