शरद पवारांच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. या हल्लेखोरांचा अटकाव करण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने सध्या पवारांसाठी असलेली सुरक्षा व्यवस्था तोकडी असल्याचे सिद्ध झाले आहे. या घटनेमुळे सरकार खडबडून जागं झालं असून आज अनेक घडामोडी वेग घेत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत आज अनेक महत्वाच्या भेटी, बैठका सुरु आहेत. सध्या सुरु असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यातील महत्त्वाच्या बैठकीत शरद पवार आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत सरकार मोठा निर्णय करण्याची शक्यता आहे.

पोलीसखात्यावर सर्व बाजूंनी होणाऱ्या टीकेनंतर गतिशील होत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसंच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. त्यामुळे आता पवारांची सुरक्षा वाढविण्याच्या निर्णयाप्रत सरकार आलं आहे.

शरद पवार यांचा आज साताऱ्यातील महाराष्ट्र केसरी कुस्ती दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र, उद्या शरद पवार जाणार असलेल्या नागपूर दौऱ्यामध्ये त्यांच्या दिमतीला कडेकोट सुरक्षाव्यवस्था असेल. नागपूर पोलीस पवारांना अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरविणार असल्याची माहिती नागपूर पोलीस आयुक्तांनी दिली आहे.