‘सारथी’च्या संशोधक विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण आंदोलन

रजिस्ट्रेशन तारखेपासूनच फेलोशिप देण्याची मागणी

बहिरेश्वर प्रतिनिधी : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना संशोधनास चालना मिळावी, यासाठी बार्टी व महाज्योतीच्या धरतीवर सारथीमार्फत मराठा समाजातील संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. ही फेलोशिप एम.फिल. व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना दिली जाते. बार्टी व महाज्योती मार्फत दिली जाणारी फेलोशिप रजिस्ट्रेशनच्या तारखेपासून दिली जाते. मात्र, सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना मात्र रजिस्ट्रेशनच्या तारखेपासून फेलोशिप मिळत नाही. ही फेलोशिप रजिस्ट्रेशनच्या तारखेपासूनच मिळावी, या मागणीसाठी सारथीचे संशोधक विद्यार्थी ११ एप्रिलपासून आमरण उपोषण करणार आहेत. या आंदोलनाची योग्य दखल घेतली नाही, तर आंदोलन उग्र करण्यात येईल, असा इशारा संशोधक विद्यार्थी संभाजी खोत यांनी दिला आहे.             

   सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांनाही रजिस्ट्रेशनच्या तारखेपासून फेलोशिप मिळावी, यासाठी विद्यार्थी गेले कित्येक महिन्यांपासून वेळोवेळी मराठा समाजातील नेते, मराठा समाजातील लोकप्रतिनिधी यांना निवेदने देत आहेत, त्यांच्यासमोर आपल्या व्यथा व्यक्त करत आहेत. पण, कोणताही मराठा समाजाचा नेता समाजाच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला नाही व आश्वासनांच्या पलीकडे विद्यार्थ्यांना काहीही मिळालेले नाही. याउलट, बार्टी व महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्या त्यांच्या समाजातील नेत्यांनी शासनाकडे मांडून, त्याचा पाठपुरावा करून मान्य करून घेतल्या आणि त्यांच्या समाजातील मुलांना न्याय देण्याचे काम केले आहे. हे पाहून मराठा समाजातील नेत्यांवर विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहेत. शासनाच्या व नेत्यांच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे संशोधक विद्यार्थ्यांची सध्या फरफट चालू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्या संदर्भात रोष निर्माण झालेला आहे.

यासाठी संशोधक विद्यार्थ्यांनी यापूर्वी २८ फेब्रुवारीला केलेल्या आंदोलनावेळी  १५ मार्चला होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देवून डेक्कन जिमखाना पुणे पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित केले होते. परंतु आज एप्रिल महिना उलटला तरीही अजूनही संचालक मंडळाची बैठक झालेली नाही आणि विद्यार्थ्यांच्या मागणीवर कोणताही निर्णयही दिलेला नाही.

या सर्व घडामोडी पाहता आता सराठीचे सर्व ५५१ मराठा संशोधक विद्यार्थी नाराज असून ते ११ एप्रिलला आमरण उपोषणाला बसणार आहेत व जोपर्यंत मागणी मान्य केली जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. या उपोषणाच्या आंदोलनाची पूर्ण जबाबदारी सारथी संस्थेची व महाराष्ट्र शासनाची असणार आहे, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. शासनाने व मराठा समाजातील नेत्यांनी सारथी संशोधक विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा व त्यांना रजिस्ट्रेशनच्या तारखेपासूनच फेलोशिप मिळावी, यासाठी प्रयत्न करावे. अन्यथा, उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सारथी फेलोशिपधारक संशोधक विद्यार्थी संभाजी खोत यांनी दिला आहे.