वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांना शिक्षा

कोल्‍हापूर : गरिबी आणि असहायतेचाचा फायदा उठवत मुलींना वेश्‍या व्यवसायात ओढणाऱ्या तसेच एका मुलीची विक्री करण्याच्या दोषाआरोपाखाली दोन महिलांसह तिघांना दहा वर्षांची तर एकाला दोन वर्षांची सक्‍तमजुरीची शिक्षा आज कोल्हापूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी सुनावली.

सरीता रणजीत पाटील (वय ४१, रा. पाचगाव, करवीर), विवेक शंकर दिंडे (३१, रा. राजारामपुरी), मनिषा प्रकाश कट्टे (३०, रा. भोसलेवाडी, कोल्‍हापूर) या तिघांना १० वर्षे सक्‍तमजुरी व २९ हजार रुपये दंड ठोठावला. तर वैभव सतिश तावसकर (२८, रा. पांगरी, सोलापूर) तर याला दोन वर्षे सक्‍तमजुरी व ४ हजारांचा दंड ठोठावला.

याबाबत माहिती अशी, यातील आरोपी सरीता पाटील ही कळंब्यातील एका अपार्टमेंटमध्‍ये कुंटणखाना चालवत होती. विवेक दिंडे व वैभव तावसकर हे गरजू व असहाय्य महिलांना वेश्‍या व्‍यवसायासाठी सरीता पाटील हिच्‍याकडे पाठवत होते. पुण्‍यात शिकणाऱ्या नेपाळी मुलीची या टोळीतील महिलांनी विक्री केल्‍याचे उघड झाले आहे. तर दुसरी मुलगी वडिलांच्‍या आजारपणामुळे वेश्‍या व्‍यवसायात ओढली गेली होती. २०१९ मध्‍ये करवीर पोलिसांनी छापा टाकून पीडित मुलीची सुटका केली होती. करवीर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल होवून याची सुनावणी जिल्हा व सत्र न्‍यायालयात चालली. याचा आज निकाल लागला.