महापूराच्या विळख्यातून कोल्हापुरकरांची कायमची सुटका करण्यासाठी प्राधान्य देणार : सत्यजित कदम

कोल्हापूर : महापूराचा फटका बसल्याने कोल्हापूरचे अपरिमित नुकसान होत आहे. महापूराचे संकट जसे निसर्ग निर्मित आहे, तसेच ते मानवनिर्मितही आहे. २००३ साली बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भरावामुळे पुराच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे अर्धे कोल्हापूर शहर पाण्याखाली जाते. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी देण्याचे आश्‍वासन दिले आहे., अशी माहिती कोल्हापूर उत्तर मतदार संघातील भाजपचे उमेदवार सत्यजितनाना कदम यांनी दिली.

महापूराच्या समस्येसह कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्‍न विधानसभेत ताकदीने मांडण्यासाठी आणि सोडवण्यासाठी, मतदारांनी आपल्याला साथ दयावी, असे आवाहन कदम यांनी केले. मुक्त सैनिक वसाहत येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या सभेला भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्यजितनाना कदम यांनी गेल्या १० वर्षात नगरसेवक म्हणून महापालिका सभागृहात केलेल्या कामांची माहिती दिली. भ्रष्टाचाराला आणि गैरव्यवहाराला नेहमीच विरोध केला. शहराच्या अनेक प्रश्‍नांवर आवाज उठवला. आता आमदार म्हणून विधानसभेत प्रश्‍न मांडून ते सोडवण्याची क्षमता असल्याने, कोल्हापूर उत्तरच्या जनतेने संधी दयावी, असे आवाहन कदम यांनी केले. त्यासाठी सत्यजितनाना कदम यांनी कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन मांडले. दर एक-दोन वर्षांनी महापूरामुळे कोल्हापूर शहरातील अनेक कुटुंबांना स्थलांतरीत व्हावे लागते. अनेकांच्या घरांची पडझड होते. त्यामुळे महामार्गाचा भराव हटवून त्याठिकाणी उड्डाण पुल बांधण्याची गरज आहे. त्यादृष्टीने काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरून गृहराज्यमंत्र्यांचा समाचार घेतला. कोल्हापूर जिल्हयात गेल्या वर्षभरात बलात्काराच्या १६२ घटना घडल्या. ३१६ विनयभंग, ६ नवविवाहितांनी आत्महत्या केल्या. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे ८४ गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय खून, चोरी, मटका, घरफोडी असे गुन्हे कोल्हापुरात वाढत आहेत. त्याबद्दल गृहराज्यमंत्री का बोलत नाहीत, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. दरम्यान सभा सुरू असताना अज्ञात व्यक्तीने व्यासपीठाच्या मागून सभेच्या दिशेने काही दगड भिरकावले गेले. त्यातून दहशत पसरवून मतदारांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून होत असल्याचा आरोप, चित्रा वाघ यांनी केला. तसेच भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी झटणार्‍या धनंजय महाडिक यांच्याकडून महिलांचा अपमान होणे शक्य नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर उत्तरची निवडणूक सहानुभुतीच्या नव्हे तर, विकास आणि विश्‍वासाच्या जोरावर होईल आणि या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सत्यजितनाना कदम विजयी होतील, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, माजी महापौर सुनिल कदम, भगवान काटे, माजी नगरसेवक राजसिंह शेळके, बंडा साळुंखे, संगीता खाडे यांच्यासह मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.

दहशत माजवण्याचा प्रकार
मुक्तसैनिक वसाहत येथे भाजपची प्रचार सभा सुरू असताना, अचानक वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात चित्रा वाघ यांनी भाषण सुरू ठेवले. त्याचवेळी व्यासपीठाच्या पाठीमागील बाजूने काही दगड आले. त्यामुळे सभास्थळी काहीकाळ तणावपूर्ण बनले होते. सभा झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी टि्वट करून दगडफेकीच्या घटनेची माहिती दिली. पराभव समोर दिसू लागल्यामुळे मतदारांवर दहशत माजवण्यासाठी असे प्रकार होत आहेत. पण विरोधकांच्या दहशतीच्या राजकारणाला आपण आणि भाजप भीक घालणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.