राज्यातील महिला अत्याचाराबद्दल मौन बाळगणारे सतेज पाटील निष्क्रिय गृहराज्यमंत्री : चित्रा वाघ

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. मात्र त्याबद्दल नामदार सतेज पाटील यांनी आजपर्यंत एकदाही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ठोस पावले उचललेली नाहीत. महिलांच्या अत्याचारावर नेहमी मौन बाळगणारे सतेज पाटील म्हणजे निष्क्रिय गृहराज्यमंत्री आहेत, अशी जळजळीत टीका भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार सत्यजितनाना कदम यांच्या प्रचारासाठी, आज शुक्रवार पेठेत, भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत चाय पे चर्चा आणि महिला मेळावा पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजप-ताराराणी आघाडीचे माजी नगरसेवक किरण शिराळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात बोलताना चित्रा वाघ यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कामगिरीचे चांगलेच वाभाडे काढले. महाविकास आघाडी सरकारच्या गेल्या अडीच वर्षाच्या काळात गुंडगिरी, भ्रष्टाचार, खंडणी यासह महिलांवरील अत्याचार वाढले. गृहखात्याच्या कारभाराबद्दल अनेक प्रश्‍न निर्माण झाले. त्याबद्दल गृहराज्यमंत्र्यांनाही जाब विचारणे आवश्यक आहे. एकिकडे भाजपच्या प्रचारात सहभागी होणार्‍यांना गृहराज्यमंत्री दादागिरी करून दहशत दाखवतात. मात्र आता कोल्हापूर शहरातील महिला गृहराज्यमंत्र्याना धडा शिकवतील, असा दावा चित्रा वाघ यांनी केला. संपूर्ण देशात कॉंग्रेसची पिछेहाट झाली आहे. ज्या पक्षाला भविष्य नाही, अशा पक्षाला कोल्हापुरातूनही मतदार हद्दपार करतील, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी हल्ला चढवला. नामदार सतेज पाटील यांनी जाणीवपूर्वक थेट पाईपलाईन योजना रखडत ठेवून, लोकांना गाजर दाखवले. कोल्हापूरवर टोल लादून टोलची पावती फाडून, जनतेच्या जखमेवर मीठ चोळले. कोरोना काळात कोल्हापुरात प्रचंड भ्रष्टाचार झाला. त्यामुळे जनतेनेच आता या निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेस आणि सतेज पाटील यांना कायमचा धडा शिकवावा, महिलांबद्दल खोटा कळवळा त्यांनी दाखवू नये, असे सुनावले. कोल्हापूर उत्तरची निवडणूक सहानभुतीच्या मुद्दयावर नवे तर विकास आणि विश्‍वासाच्या मुद्दयावर लढली जावी, अशी अपेक्षाही चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.

यावेळी सौ.अरूंधती महाडिक यांचेही भाषण झाले. कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सत्यजितनाना कदम यांना विजयी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच नव्याने आणलेल्या योजनांचे महत्वही महाडिक यांनी स्पष्ट केले.

तर उमेदवार सत्यजितनाना कदम यांनी गेल्या १० वर्षात महापालिकेच्या कारभारात सतेज पाटील यांनी केलेल्या हस्तक्षेपाची माहिती दिली. सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधणी, थेट पाईपलाईनद्वारे घरोघरी गॅस पुरवठा, पोलिस उद्यानाचा विकास यासारखी जनतेच्या हिताची भाजप-ताराराणी आघाडीने सुचवलेली कामे, सतेज पाटील यांनी राजकीय द्वेष भावनेतून रोखून धरल्याचे सांगत, सतेज पाटील यांच्या सुडाच्या राजकारणावर भाष्य केले.

माजी नगरसेवक किरण शिराळे यांनी आपल्या भाषणात सत्यजितनाना कदम यांच्या विकासकामांचा आढावा घेतला. जनतेच्या हितासाठी धडाडीने विधानसभेत आवाज उठवण्यासाठी कदम यांना विजयी करा, असे आवाहन शिराळे यांनी केले.

यावेळी वृषाली शिराळे, विनया हुंडेकर, संदीप कुंभार, शिवानी पाटील, किरण नकाते, अमित पालोजी, अमोल पालोजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.