पेट्रोल, डिझेलची पुन्हा दरवाढ

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. पेट्रोलच्या दरात ५३ पैशांनी तर डिझेलच्या दरात ५५ पैशांनी वाढ झाली आहे.

तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सहा दिवसांत पाच वेळा वाढ करून सर्वसामान्यांना चांगलाच दणका दिला आहे. यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांनी २२ मार्च, २३ मार्च, २५ मार्च आणि २६ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केली होती. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असून, पेट्रोलियम कंपन्या त्याचा भार ग्राहकांवर टाकत आहेत. त्यामुळे इंधन दरांत वाढ केली जात आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती $११२ प्रति बॅरलवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर २५ रुपयांनी वाढ केली होती.

मुंबईत पेट्रोलचे दर ११३ रुपये ३५ पैशांवरून ११३ रुपये ८५ पैसे झाले आहेत. डिझेलचे दरही ९७ रुपये ५५ पैशांवरून ९८ रुपये १० पैसे झालेत. दिल्लीत पेट्रोल ९८ रुपये ६१ पैशांवरून ९९ रुपये ११ पैसे झाले, तर डिझेल ८९ रुपये ८७ पैशांवरून ९० रुपये ४२ पैशांवर गेले आहेत.