जिल्ह्यात २९ मार्चपर्यंत मनाई आदेश जारी

 कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. १२ एप्रिल रोजी मतदान व १६ एप्रिल  रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१  चे कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये दि. १६ मार्चपासून ते दि. २९ मार्चर्पर्यत जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी मनाई आदेश जारी केला आहे.

        दि. १२ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. दिनांक १७ मार्च रोजी होळी, १८ मार्च रोजी धुलिवंदन, २१ मार्च रोजी शिवजयंती (तिथीप्रमाणे) व २२ मार्च रोजी रंगपंचमी तसेच जिल्ह्यात  विविध पक्ष/संघटना, व्यक्ति/समुह यांच्याकडून विविध मागण्या संदर्भाने मोर्चा, रॅली, उपोषण, आत्मदहन, धरणे इ. प्रकारची संभाव्य आंदोलने, तसेच जिल्ह्यातील विविध पक्ष/ संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार होणारी आंदोलने या बाबत जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडू नये यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.
हा हुकुम ज्या सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविणेचे संदर्भात तसेच निवडणुकीचे कामकाज करताना उपनिर्ऱ्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात, आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधिक्षक, कोल्हापूर अगर संबंधित  उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना, तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा, इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना  लागू पडणार नाही.