प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानीत कडक पोलीस बंदोबस्त…!

87

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ७१ वा प्रजासत्ताक दिवस उद्या देशभरात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.दिल्लीत येणाऱ्या सर्व बॉर्डरवर नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी ड्रोनची करडी नजर असणार आहे.दिल्लीतील सर्व प्रवेशाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. मेट्रोची पार्किंग सकाळपासून उद्या दुपारी दोनपर्यंत बंद करण्यात आली आहे. देशभरातही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.जम्मू काश्मीरच्या सर्वच जिल्ह्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि अन्य ठिकाणी पोलीसांची सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

राजधानीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेली दिल्ली पोलिस सतर्क झाली आहे. विध्वंसक शक्तींना लपण्याची संधी मिळू नये म्हणून पोलिसांनी आजपासून नवी दिल्ली, मध्य दिल्ली आणि उत्तर दिल्लीची बहुमजली खासगी आणि सरकारी इमारती रिकाम्या करून सील करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीची सुरक्षा संवेदनशील असल्याने पोलीसांचे विशेष सेल आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

दिल्ली पोलिस मुख्यालयाच्या माहितीनुसार, “यावेळी राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ४८ केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात असणार आहेत. त्यासाठी संबंधित विभागांकडून लेखी मान्यताही मिळाली आहे, तर दिल्ली पोलिसांचे २२  हजार कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात आहेत. प्रजासत्ताक दिवस परेडवेळी संवेदनशील ठिकाणं आणि इमारतींच्या बाहेर ब्लॅक कमांडो तैनात करण्यात येणार आहे. परेडनंतर राष्ट्रपती भवनात होणाऱ्या ‘एटहोम’पर्यंत सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीच्या सीमाभागात सुरक्षेसाठी संबंधीत राज्याच्या पोलीसांसोबत रणनीती आखण्यात आली आहे.

आपातकालीन परिस्थितीत चालत्या फिरत्या मोबाईल कंट्रोल रूम बनवण्यात आल्या आहेत. या खास प्रकारच्या मोबाईल कंट्रोल रुममध्ये इंटेलिजेंस कॉल-सिग्नल्सही निश्चित करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत फक्त दिल्ली पोलीसांना या गोष्टी समजतील. परेड दरम्यान गर्दी थांबविण्याचीही काळजी घेतली जाईल. यासाठी दिल्ली वाहतूक पोलिसांचे २००  हून अधिक जवान रस्त्यावर तैनात असतील.