पी.एन.पाटील चाळीस वर्षांच्या पक्षनिष्ठेला सोडचिठ्ठी देणार?

0
2380

कोल्हापूर (नवाब शेख): मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली की नेहमीच चर्चेत येणाऱ्या पी.एन.पाटील यांना मंत्री पदाने सातत्याने हुलकावणी दिली आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सुरू झालेला हा ‘सिलसिला’ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम राहिला आहे. चर्चेत नाव असूनही मंत्रीपदाचा ‘सायरन’ ‘गॅरेजवर’ वाजण्याऐवजी ‘अजिंक्यतारा’ वरच वाजल्याने काँग्रेस पक्षाशी सलग चाळीस वर्षे एकनिष्ठ राहिलेल्या आ.पी.एन.पाटील-सडोलीकर आणि त्यांच्या समर्थकांच्या ‘संयमाचा बांध’ उद्या(१जानेवारी) फुलेवाडी येथील अमृत मल्टीपर्पज हॉलमध्ये फुटण्याची दाट शक्यता आहे.

पी.एन.पाटील यांनी पक्षनिष्ठा बाजूला ठेवून आपल्या गटाचे अस्तित्व वेगळे ठेवावे यासाठी पी.एन.समर्थकांचा दबाव वाढू लागला आहे. असे झाल्यास जिल्ह्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळू शकते. पी.एन.पाटलांनी मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून काँग्रेसची फारकत घेतल्यास येऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसह आगामी गोकुळ दूध संघ तसेच महापालिका निवडणुकीत देखील काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्या (१जानेवारी) फुलेवाडीतील अमृत मल्टीपर्पज हॉलमध्ये पी.एन. पाटील-सडोलीकर समर्थकांचा व्यापक मेळावा होत आहे. या मेळाव्यास पी.एन. पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करण्याच्या मानसिकतेत असल्याचे कळते. हा निर्णय पी.एन.पाटील यांनी अंमलात आणल्यास नूतन राज्यमंत्री सतेज  पाटील गटाला मोठा धक्का बसणार आहे. तर महाडिक गट आणि भाजपला उभारी मिळणार आहे.

पी.एन.पाटील-सडोलीकर गटाचे सेनापती आणि करवीर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब खाडे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास पी.एन.पाटील-सडोलीकर उपस्थित राहणार का? आणि उपस्थित राहिलेत तर नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सतेज पाटील गट आणि महाडिक गटाचे लक्ष राहणार आहे. या मेळाव्यात होणारा निर्णय जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलणार ठरतो की… पी.एन. ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here