सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने सेल्फी घेत संपवलं आयुष्य

बुलढाणा : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता बुलढाणा जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील नवविवाहित महिलेने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं आहे. या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी गळफास घेत असल्याचा एक सेल्फी सुद्धा क्लिक केल्याचं समोर आलं आहे.

मेघा वाघ अस आत्महत्या करणाऱ्या विवाहितेच नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विवाहितेने आत्महत्येपूर्वी गळ्यात फास अडकवून सेल्फी काढला होता. हा सेल्फी तिने आपल्या नातेवाईकांना पाठवून गळफास घेतला असं बोललं जात आहे. सेल्फी क्लिक करुन आत्महत्या केल्याच्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 20 वर्षीय विवाहितेने घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बुलडाण्यातील कठोरा येथे घडली आहे. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. जेवण बनवता येत नाही आणि केलं तर खूपच जास्त करत असते असे सासरच्या मंडळींकडून वारंवार बोलून हिणवलं जात होतं.