नाना पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध करत नाशकात जोरदार आंदोलन

नाशिकः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने राज्यभर आंदोलन पेटवले असून, नाशिकमध्येही जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला.

सातपूर परिसरात नाना पटोलेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पटोलेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी केली.

नेमके प्रकरण काय?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. पटोले म्हणतात की, “मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षांपासून राजकारणात आहे. लोक पाच वर्षांत आपल्या एका पिढीचा उद्धार करून टाकतात. शाळा, कॉलेज हे करून आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करून टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे…” असे आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. त्यामुळे भाजपने नाना पटोले यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.