“हे” आमदार महाविकासआघाडीच्या वाटेवर?

0
214

 मुंबई प्रतिनिधी:राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे यापूर्वी भाजपाला पाठिंबा दिलेले अनेक अपक्ष महाविकास आघाडीकडे वळू लागले आहेत. भाजपाला पाठिंबा दिलेले बार्शीचे राजेंद्र राऊत तसेच लोह कंधारचे श्यामसुंदर शिंदे यांचा यामध्ये समावेश असल्याची चर्चा आहे.

सत्ता बदलताच अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार राष्ट्रवादी आणि सेनेकडे जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे सत्तेत वाटा आणि आपल्या मतदारसंघातील कामे झाली पाहिजेत, या दृष्टीने सत्तेत जाण्याचा निर्णय काही अपक्ष आमदारांनी घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर येथील बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

१९९९ साली सर्वप्रथम शिवसेनेने राऊत यांना बार्शीतून विधानसभेची उमेदवारी दिली. पुढे २००४ साली दुसऱ्यांदा लढताना ते आमदार झाले. परंतु नंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राऊत हे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले होते. त्यानंतर २००९ साली त्यांनी विधानसभा लढवली. मात्र मागील लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी बदलते राजकीय हवामान लक्षात घेऊन काँग्रेस सोडली आणि पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. सेनेच्या तिकिटावर त्यांनी मागील विधानसभेची निवडणूक पुन्हा लढवली. २०१४ मध्ये सेनेकडून आणि २०१९ मध्ये अपक्ष म्हणून उभे राहिले होते. याशिवाय माजी आमदार सोपल हे सेनेत गेल्याने बार्शीमध्ये राष्ट्रवादीला चेहरा नसल्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांनी राजा राऊत यांना संपर्क केला आहे.

शिवसेना, काँग्रेस, भाजप असा राऊत यांचा प्रवास राहिला आहे. २ वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवण्याचा देखील प्रयत्न करून पाहिला. मात्र जागावाटपात बार्शी मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने त्यांनी पुन्हा अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळविला. अपक्ष निवडून येताच त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. मात्र, आता भाजपची सत्ता येऊ शकत नसल्याने राऊत हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा असून राष्ट्रवादीलाही सोपल यांना पर्यायी चेहरा हवाच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here